चिपळूण, दि. १५ : सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी नुकत्याच निवड झालेल्या ऍड. प्रज्ञा बघेल-चितळे यांचा चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. आपल्या कार्यकुशलतेने व कायद्याच्या क्षेत्रातील भक्कम योगदानामुळे त्या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या इतिहासात गेल्या ७५ वर्षांत सेक्रेटरीपदी निवड झालेल्या चौथ्या महिला ठरल्या आहेत.
ऍड. प्रज्ञा बघेल-चितळे या चिपळूण येथील प्रसिद्ध वकील ऍड. अमोल चितळे यांची पत्नी असून त्यांचे मूळ गावही चिपळूणच आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल चिपळूणवासीयांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे.
चिपळूण अर्बन बँकेत आयोजित सत्कार समारंभात बँकेचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री. सतीश अप्पा खेडेकर, तज्ञ संचालक ऍड. दिलीप दळी, संचालक श्री. निहारशेठ गुढेकर, सीए. विवेक रेळेकर, श्री. सुनिल खेडेकर, श्री. रत्नदीप देवळेकर, अधिकारी श्री. संजय कामेरकर, श्रीमती अपर्णा चितळे, श्री. अमित चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऍड. प्रज्ञा बघेल-चितळे म्हणाल्या, “चिपळूणची माती आणि इथल्या लोकांचे प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे. बँकेच्या या सन्मानामुळे अधिक जबाबदारीची जाणीव झाली आहे.”
त्यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले असून, चिपळूण शहराने एक उत्तुंग यश आपल्या झोळीत भरले आहे.