चिपळूण, दि. १२ (अनिल फाळके): कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. याचाच भाग म्हणून चिपळूण स्थानकात नवी ‘कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या बोर्डवरून प्रवाशांना त्यांच्या गाडीचा क्रमांक, कोच क्रमांक, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि प्रवासासंबंधी महत्त्वाची माहिती सहज मिळणार आहे.
याशिवाय प्लॅटफॉर्मवर नव्या एलसीडी टीव्ही स्क्रीन बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे प्रवाशांना आवश्यक प्रवासी माहितीबरोबरच विविध जाहिरातीही पाहायला मिळतील. जाहिरातीसाठी इच्छुकांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही सुविधा पुणे येथील ‘पारट्रॉनिकस ई-बोर्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना तात्काळ व अचूक माहिती मिळून प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, स्थानिक प्रवासी व पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.