रत्नागिरी, दि. ०८ (प्रतिनिधी): जिल्ह्यात डझनभर सीएनजी पंप असले, तरी तुटवडा काही कमी झाल्याचे दिसत नाही. नेहमीच्या दिवसात काही पंपात तुटवडा जाणवत असतो, याची झळ रिक्षा चालकांसह अनेक वाहनधारकांना पोहोचते. यातून जिल्हा प्रशासनाला मात्र कोणतीच जबाबदारी घ्यावी असे वाटत नसल्याचे दिसत आहे.
कोकणात होळीसह गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, याची जाणीव असतानाही जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारे कोटा वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आढळून येत आहे. पूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर सीएनजीचा पुरवठा केला जात असे, मग तो पुरवठा थांबविला गेला असल्यास व जिल्ह्यात डिंगणी येथे थेट पाईपलाईन असूनही जिल्हावासीय सीएनजीसाठी रात्रंदिवस ऊन-पावसात रांगा लावून उभे असतात. त्यातच पर्यटन स्थळ असल्याकारणाने जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याला गृहीत धरून प्रशासनाने सीएनजीचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
अशा तऱ्हेने सीएनजीचा तुटवडा रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागल्यास त्याचा परिणाम पर्यटन महसुलावर होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील व्यापारी वर्ग व वाहनधारक सीएनजी कंपनीसह प्रशासनावर नाराज आहेत.
दरम्यान, यातून पर्यटनावर आधारीत हॉटेल्स, बाजारपेठा, मंदिरे, समुद्रकिनारे यावरील पर्यटन महसुलाला खिळ बसविण्याचा विचार आहे का? असा सवालही सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या संदर्भात काही वाहनचालक संघटना तसेच सामान्य नागरिक पालकमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेणार असल्याचेही ऐकिवात येत आहे.