मुंबई, दि. १६ : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर उतरल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण शिबिरात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचे राजकीय संकेत आहेत.
स्थानिक नेतृत्वाचा आग्रह — वर्षा गायकवाड
या निर्णयाबाबत बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, “स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची होती. बीएमसी निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी, अशी आमची मागणी होती आणि शिबिरात त्यावर एकमत झाले.” मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही याच भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली असली तरी इतर पक्षांसोबत चर्चा सुरू ठेवण्याचे संकेतही गायकवाड यांनी दिले. “काही पक्ष आम्हाला सोबत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा चालू राहील,” असे त्या म्हणाल्या. शरद पवार गटासोबत काँग्रेसची ‘नैसर्गिक आघाडी’ असल्याचेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी मनसेवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले, “आम्ही संविधान मानणारे, सर्वसमावेशक विचारांचे लोक आहोत. काही पक्ष मारहाण, दादागिरी, अयोग्य भाषा अशा पद्धतीने राजकारण करतात, जे आमच्या संस्कृतीला शोभणारे नाही.”
काँग्रेसच्या या घोषणेनंतर मुंबई महापालिका निवडणुकीची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची पुढील भूमिका काय असेल, हे आगामी राजकीय घडामोडींमध्ये निर्णायक ठरेल.








