दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला

कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण; जालगाव पांगारवाडीतील धक्कादायक घटना, संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात

दापोली, दि. २३ : तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील आग्रे (४०) याने वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. तसेच आई अनिता आग्रे यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची माहिती आहे. हा प्रकार राहत्या घरातच घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

हल्ल्यात दोघांच्या शरीरावर विविध ठिकाणी दुखापत झाली. घटनेनंतर जखमी मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुनील आग्रे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की अन्य कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर आवश्यक तपासाची प्रक्रिया सुरू असून, तपासानंतर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा