शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर आमरण उपोषणाची वेळ

५६ कर्मचाऱ्यांना कायम करा, बेकायदा रेखांकन रद्द करा; प्रसाद कर्वे यांचे नगरपंचायतीसमोर उपोषण

दापोली, दि. २ : दापोली नगरपंचायतीतील ५६ अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे आणि मौजे जोगेळे येथील कथित बेकायदा निवासी रेखांकन रद्द करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद उर्फ बाळा कर्वे यांनी २ ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

कर्वे यांनी ९ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यावर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करत त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

दापोली नगरपंचायतीतील ५६ अस्थायी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, तसेच नगरपंचायत हद्दीतील मौजे जोगेळे येथील सर्व्हे क्रमांक २४/१, २४/२, २४/३, २५/३, २५/६, २१/३ आणि २८/१२ या क्षेत्रातील कथित अनधिकृत निवासी रेखांकनातील बांधकामांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी कर्वे यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे कर्वे यांनी म्हटले आहे. मात्र, यापूर्वी कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत न ठेवताही घेण्यात आल्याचा दावा करत, “दापोली नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठीच दिरंगाई का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रश्नासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम पाठपुरावा करत असल्याचेही कर्वे यांनी सांगितले. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खाते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही प्रश्नांची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी कर्वे यांनी केली आहे.

दरम्यान, जोगेळे येथील रेखांकनाबाबत कर्वे यांनी काही गंभीर आरोप केले असून, संबंधित प्रकरणाची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पूर्वी कार्यरत राहिलेले कर्वे हे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे दापोली नगरपंचायतीतील कर्मचारी प्रश्न आणि जोगेळे येथील रेखांकनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा