मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या शब्दप्रयोगावरून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर महिला नेतृत्वाचा अवमान केल्याचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला, तर काँग्रेसने हा शब्दप्रयोग राजकीय टीकेचा भाग असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार लढत रंगली आहे.
‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नाही; कर्तृत्वातून ‘दुर्गा’ असल्याचे सिद्ध करावे – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेला ‘गुंगी गुडिया’ हा शब्द अपशब्द किंवा असंसदीय नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही विरोधकांनी याच शब्दाने संबोधले होते; मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून नेतृत्व सिद्ध केले आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना ‘दुर्गा’ म्हटले, असे ते म्हणाले. बीडमध्ये पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखले जात असताना सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्यामुळे हा शब्दप्रयोग केल्याचे स्पष्टीकरण देत, त्यांनीही आपल्या कामगिरीतून नेतृत्व सिद्ध करावे, असे सपकाळ यांनी सांगितले.
या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन येथे काँग्रेस कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केले. “ये गुंगी गुडिया नहीं, ये आंधी है”, “हर्षवर्धन सपकाळ हाय हाय”, “हर्षवर्धन सपकाळ माफी मागा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, महिला जिल्हाध्यक्षा पूजा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा शब्दप्रयोग अपशब्द किंवा असंसदीय नसल्याचे स्पष्ट केले. “माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ म्हटले जात होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कामगिरीतून ते सिद्ध करावे,” असे ते म्हणाले. बीडमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याच्या संदर्भातून हा शब्दप्रयोग वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेसची भूमिका समर्थित करत, “टीका झाली म्हणून सत्तेचा धाक दाखवणे लोकशाहीला शोभणारे नाही. इंदिरा गांधींनाही अशाच टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यांनी संघर्षातून नेतृत्व सिद्ध केले,” असे म्हटले.
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महिला नेत्यांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगत या प्रकरणाचा निषेध केला. काँग्रेसने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘वेळ आल्यावर योग्य उत्तर देईन’ – सुनेत्रा पवार
मुंबई : काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संयत प्रतिक्रिया दिली. “वेळ आल्यावर योग्य उत्तर देईन,” असे त्या म्हणाल्या. बीडमधील एका कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांवरून काँग्रेसने त्यांच्यावर ही टीका केली होती. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून महायुतीतील नेत्यांनी काँग्रेसवर महिलांचा अवमान केल्याचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत संबंधित वक्तव्य मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे.
या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महिला नेत्यांबाबत वापरल्या जाणाऱ्या भाषेची मर्यादा, सोशल मीडियावरील राजकीय संवाद आणि सभ्य राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.








