चिपळूण, दि. ०१ : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे गावची सुकन्या दिव्या देवदास चिपळूणकर हिने ‘मिसेस महाराष्ट्र २०२६’ स्पर्धेत सेकंड रनर-अप हा मानाचा किताब पटकावत कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बालपणापासूनच नृत्य आणि मॉडेलिंगची आवड जोपासणाऱ्या दिव्याने विविध राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा आणि मॉडेलिंग स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. विवाहानंतर ती पेण येथील शहा परिवारात कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत तब्बल बारा वर्षे व्यस्त होती. या काळातही तिने आपल्या कलागुणांना विराम न देता कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत अनेक नामांकित ब्रँडसाठी सर्जनशील डिजिटल कंटेंट तयार केला. पाच वर्षांच्या मुलाची जबाबदारी सांभाळत तिने आपल्या करिअरचीही यशस्वी वाटचाल सुरू ठेवली.
बारा वर्षांनंतर आपल्या स्वप्नांना पुन्हा नव्याने उभारी देत दिव्याने नवी मुंबई येथे आयोजित ‘मिसेस महाराष्ट्र २०२६’ स्पर्धेत सहभाग घेतला आणि सेकंड रनर-अपचा मान पटकावला. तिच्या या यशातून “स्वप्नांना जिद्दीची साथ असेल, तर वय आणि परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही,” हा प्रेरणादायी संदेश अधोरेखित झाला आहे.
दिव्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अलोरे पंचक्रोशीसह चिपळूण परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे कोकणातील महिलांना नव्या उमेदीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळाली आहे.








