मुंबईत मतदानाचा टक्का घसरला; कोल्हापूर अव्वल, २९ महापालिकांत संमिश्र प्रतिसाद

मुंबई, दि. १५ : राज्यात तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सकाळपासूनच अनेक शहरांमध्ये मतदानासाठी रांगा दिसून आल्या, मात्र एकूणच पाहता यंदा मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचं चित्र समोर आलं आहे.

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दुपारी ३.३० वाजेपर्यंत केवळ ४१.०८ टक्के मतदानाची नोंद झाली. मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक २२७ मध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अवघे १५.७३ टक्के मतदान झाल्याने हा वॉर्ड राज्यातील सर्वात कमी मतदान झालेल्या वॉर्डपैकी एक ठरू शकतो. अंतिम आकडेवारी संध्याकाळनंतर जाहीर होणार असली, तरी महानगरांमध्ये मतदानाचा उत्साह तुलनेने कमी असल्याचं स्पष्ट दिसून आलं.

राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये ४० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले असून, कोल्हापूर महानगरपालिका मात्र याला अपवाद ठरली. कोल्हापुरात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली असून, राज्यात सर्वाधिक मतदानाची आघाडी कोल्हापुरने घेतली आहे. त्याखालोखाल परभणी (४९.१६ टक्के) आणि अहिल्यानगर (४८.४९ टक्के) या शहरांमध्ये समाधानकारक मतदान झाल्याचं दिसून येत आहे.

२९ महापालिकांतील मतदान टक्केवारी (दुपारी ३.३० पर्यंत):
बृहन्मुंबई – ४१.०८
ठाणे – ४३.९६
कल्याण-डोंबिवली – ३८.६९
नवी मुंबई – ४५.५१
उल्हासनगर – ३४.८८
भिवंडी-निझामपूर – ३८.२१
मिरा-भाईंदर – ३८.३४
वसई-विरार – ४५.७५
पनवेल – ४४.०४
नाशिक – ३९.६४
मालेगाव – ४६.१८
धुळे – ३६.४९
जळगाव – ३४.२७
अहिल्यानगर – ४८.४९
पुणे – ३६.९५
पिंपरी-चिंचवड – ४०.५०
सोलापूर – ४०.३९
कोल्हापूर – ५०.८५
सांगली-मिरज-कुपवाड – ४१.७९
छत्रपती संभाजीनगर – ४३.६७
नांदेड-वाघाळा – ४२.४७
लातूर – ४३.५८
परभणी – ४९.१६
अमरावती – ४०.६२
अकोला – ४३.३५
नागपूर – ४१.२३
चंद्रपूर – ३८.१२
इचलकरंजी – ४६.२३
जालना – ४५.९४

मोठ्या शहरांमध्ये मतदान घटण्याचं कारण काय?

राजकीय विश्लेषकांच्या मते, महापालिका निवडणुका तब्बल नऊ वर्षांनी होत असल्या तरी मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित मतदार, कामाचा ताण, राजकीय नाराजी आणि उमेदवारांबाबत असलेली उदासीनता यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ईव्हीएम बिघाड, वाद आणि तणाव

मतदानादरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघाडाच्या घटना घडल्या. पुणे, धुळे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावती येथे काही काळ मतदान ठप्प झालं. पुण्यात काही मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेपाच नंतरही मोठी गर्दी होती. मशीन बंद असल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त झाली, तर काही ठिकाणी घोषणाबाजीही करण्यात आली.

ठाण्यातील कळवा प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. मारहाणीच्या आरोपांमुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. जालन्यात मतदानासाठी आलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडून १५ जण जखमी झाले.

पैशांचा वापर; भरारी पथकांची कारवाई

निवडणूक काळात रोख रकमेच्या गैरवापराच्या घटनाही समोर आल्या. पनवेलमधील खारघर परिसरात २.१३ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर अकोल्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला तब्बल ५० लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणांचा तपास निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून सुरू आहे.

मतमोजणीची तयारी पूर्ण

आजच्या मतदानानंतर आता सर्वांचं लक्ष उद्या (१६ जानेवारी) होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली असून, सीसीटीव्ही निगराणी, पोलीस बंदोबस्त आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले आहे.

एकूणच, यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी असला, तरी काही शहरांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आता या मतदानातून महायुतीला कौल मिळतो की विरोधकांना संधी मिळते, याचा फैसला उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

photo credit : The Sunday Guardian website

आणखी वाचा