लांजा दि. १ (आदित्य बाकाळकर): ६७ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विभागीय पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात माननीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या लांजा येथील अमोल रंगयात्री संस्थेच्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
‘ईठ्ठला’ या नाटकाने सांघिक द्वितीय क्रमांकासह अनेक वैयक्तिक पुरस्कारांवरही आपली छाप उमटवली. दिग्दर्शनासाठी अमोल रेडीज, रंगभूषेसाठी गजानन पांचाळ, पार्श्वसंगीतासाठी प्रदीप कांबळे व महेश बामणे, प्रकाश योजनासाठी दयानंद चव्हाण, वेशभूषेसाठी संतोष डोर्लेकर व दामिनी भिंगार्डे, तर नेपथ्यासाठी संदीप सावंत व शरद चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच अमोल रेडीज आणि अर्चना पांचाळ यांना अभिनयासाठी प्रमाणपत्र देऊन मंत्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास अमोल रंगयात्रीतर्फे शरद चव्हाण, राकेश दळवी, अमित जाधव, निर्माते जयू शेठ पाखरे, अर्चना पांचाळ, संतोष डोर्लेकर आणि बबन कशेळकर यांच्यासह संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते.
अमोल रंगयात्री संस्थेने यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेली तिन्ही नाटके प्राथमिक फेरीत पुरस्कारपात्र ठरली आहेत. विशेष म्हणजे, २०१२ साली संस्थेच्या ‘जिहाद’ या नाटकाने अंतिम फेरीतील पहिल्या पाच नाटकांमध्ये स्थान मिळवून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रंगभूमीच्या इतिहासात मानाचा टप्पा गाठला होता. त्या काळात या विभागातून अंतिम पाचमध्ये पोहोचण्याची ती एकमेव कामगिरी ठरली होती.
‘ईठ्ठला’ या नाटकाबाबत रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सूचनेनुसार काही आवश्यक बदल करण्यात येणार असून, त्यानंतर नव्या नावाने या नाटकाचे प्रयोग सादर केले जातील. अनेक रसिकांना हे नाटक पाहण्याची उत्सुकता असल्याची जाणीव असून, नव्या स्वरूपातील प्रयोगांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती लेखक-दिग्दर्शक अमोल रेडीज यांनी दिली.
या नाटकाच्या निर्मितीसाठी डॉ. भगवान नारकर, शशांक उपशेटे, विजय शिंदे, दामिनी भिंगार्डे, संसारे मॅडम, जयू कुडतरकर, पियुष कुडतरकर, सायली सुर्वे, प्रदीप माजळकर, विकास चव्हाण, अनघा देवस्थळी आणि मृदुंगमणी गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना अमोल रंगयात्रीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.








