रायगड,दि. २४ (प्रतिनिधी) : घरगुती गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी मुंबई पुणे ठाणे पालघरच्या दिशेने निघाले आहेत मात्र कोकणातील रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असून चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही हाल झाले आहेत.खेड रेल्वे स्थानकात आलेली मंगला एक्स्प्रेस ही खचाखच भरून आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती रायगड जिल्हयात माणगाव वीर दरम्यान प्रचंड ट्राफिक जाम झाले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल झाले असून ज्येष्ठांसह लहान मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागला. कोकण रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे खेड रेल्वे स्थानकात प्रवाश्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. खेड येथे एक्सप्रेस रोखण्याचाही प्रयत्न झाला.
कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्या असल्या तरी परतीच्या प्रवासात रेल्वे रेल्वे गाड्यांना मोठा उशीर होत असल्याने शनिवारी संध्याकाळी नंतर सुरू केलेला प्रवास हा तब्बल 12 ते 15 तासांचा ठरला आहे. गावी आलेले गणेश भक्त आता रविवारी सकाळपासून पुन्हा मुंबई पुणे परिसराकडे आपल्या व्यवसाय नोकरी निमित्त पुन्हा निघाले आहेत.
कोकणातील रखडलेला मुंबई गोवा महामार्ग,कोकण रेल्वे प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडूनही सिंगल ट्रॅक असल्याने मोठा लोड रेल्वे मार्गावर आला आहे. अशातच गणेशोत्सव कालावधीत सिंगल लेनही सुरू करण्यासाठी प्रशासना अपयशी ठरल आहे. यामुळे महामार्गाला असलेल्या पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू होती म्हणून काहीसा दिलासा मिळाला. माणगाव दरम्यान रखडलेला पर्यायी मार्ग यामुळे या परिसरात सातत्याने वाहतुककोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून ही वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग पोलीस,रायगड व रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन वाहतुक व्यवस्थापन करण्यासाठी महामार्गावर प्रयत्न करत आहेत. पण काही वाहनचालकांच्या बेजबाबदार पणामुळेही ट्राफिक जाम होण्यात अधिकची भर पडली आहे.








