
रत्नागिरी, दि. ०७ (प्रतिनिधी): वातावरण बनले बाप्पामय कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी ला उत्साहाने सुरूवात झाली असुन रत्नागिरी चिपळूण खेड दापोली गुहागर राजापूर आदी तालुक्यात गणपती बाप्पा मोरया.मंगल मुर्ती मोरया चा जय घोष करीत 122 सार्वजनिक व सुमारे 1 लाख 67 हजार घरगुती बाप्पांचे वाजत गाजत आणि उत्साही वातावरणात आगमण झाले आहे.
आज घरोघरी बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाले असून जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरी तर ११६ सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज आहे. पोलीस दलाकडून सुरक्षेत कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिरव्यागार शेतातून डोक्यावरून गणपती घरी आणले जातात. गणपती डोक्यावरून आणणे ही परंपराच आहे. कोकणातल्या अनेक खेडेगावात ही परंपरा आजही गणेशोत्सवात कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विलोभनीय दृष्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालं. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी कोकणात गणराय विराजमान होतात.
एरवी कोकणातली गावं ओस पडलेली दिसतात. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने हीच गावं आता बहरली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सध्या उत्साहाचं वातावरण दिसत आहे. आज दिवसभर घरघुती गणरायाचं आगमन होत आहे. तर रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार, बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतिनगरचा राजा, उद्यमनगरचा राजा, तसेच सार्वजनिक बांधकाम शासकीय रुग्णालय नगरपरिषद भूमिअभिलेख पाटबंधारे जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
दरम्यान गणेश उत्सवाचा सर्वाधिक उत्साह दिसून आला तो ग्रामीण भागात. या ठिकाणी शेकडो बाप्पाचे वाजत गाजत आणि पारंपारिक पद्धतीने उत्साही वातावरण आगमन झाले आहे. गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंग व पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
गणेशभक्त वाहतूक कोंडीने “हैराण”
गणेशोत्सवासाठी चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत असून, गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात ३५०० एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. शनिवारी सकाळी आणखी २०० ते २५० बसेस गणेशभक्तांना घेऊन दाखल होत आहेत. महामार्गावरील इंदापूर, कोलाड, माणगाव येथे वाहतूककोंडी होत असल्याने रत्नागिरीत येण्यासाठी गणेशभक्तांना तब्बल १२ ते १४ तास लागत आहेत.
गणेशोत्सवासाठी एसटीने ६० दिवस आधीच ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरवर्षीप्रमाणे मुंबई व उपनगरातून जादा गाड्या जिल्ह्यात दाखल होऊ लागल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गणेशोत्सवाला गावी येणाऱ्यांचे हाल झाले. मात्र, संप मिटताच राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्या सोडल्या आहेत. मुंबई आणि उपनगरातून मंगळवारी ६०० जादा गाड्या दाखल होणार होत्या; परंतु कर्मचारी संपामुळे केवळ १३० गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्या.
बुधवारी ३००० पैकी २५०० गाड्या सोडण्यात आल्या. गुरुवारी जिल्ह्यात ८७० गाड्या दाखल झाल्या आहेत. महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका गणेशभक्तांना बसला आहे.इंदापूर, कोलाड, माणगाव येथील खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे १२ ते १४ तासांनंतर गाड्या जिल्ह्यात दाखल होत आहेत.परतीची व्यवस्था
गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठीही राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. दि. १२ रोजी गौरी-गणपती विसर्जनापासून रत्नागिरी विभागातून परतीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २००० जादा गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. गणेशभक्तांना घेऊन आलेल्या गाड्या त्या-त्या आगारातून परतीच्या प्रवासाला सोडण्यात येणार आहेत.








