मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात – आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

रत्नागिरी,दि. १७ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा हायस्कूलसमोर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात झरेवाडी, रत्नागिरी येथील आयटीआय विद्यार्थी शिवम रवींद्र गोताड (वय 19) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र निशांत कळंबटे (वय 20, झरेवाडी) गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात कोळसा वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रेलरमुळे झाला. ट्रेलरने प्रथम शिवम व निशांत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याच ट्रेलरने आणखी ३ ते ४ दुचाकी आणि २ चारचाकींनाही ठोकर दिली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, या भीषण अपघातात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे यांच्या गाडीचाही समावेश झाला होता. मात्र, ते सुदैवाने सुखरूप बचावले.

शिवम व निशांत हे दोघे रत्नागिरी आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते. रोजप्रमाणे ते झरेवाडीतून रत्नागिरीला येत होते. शाळेतून परतताना हातखंबा हायस्कूलसमोर हा अपघात घडला. शिवम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावभर शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस व महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हातखंबा परिसरात अवजड वाहनांच्या बेकाबू वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हातखंबा परिसरात सुरक्षेची उपाययोजना करून अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

आणखी वाचा