गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ तिसऱ्या दिवसअखेर गंभीर संकटात सापडला आहे. पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ केवळ 201 धावांवर बाद झाला आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं सामन्यावर भक्कम पकड निर्माण केली. भारतीय फलंदाजांत यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 58 धावा करून थोडी झुंज दिली. त्याच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार होता. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं संयमी खेळी साकारली, मात्र दोन धावांनी अर्धशतक हुकलं आणि तो 49 धावांवर बाद झाला.
तिसऱ्या दिवशीचा खरा हिरो ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जान्सन. त्यानं 19.5 षटकांत फक्त 48 धावा देत तब्बल सहा भारतीय फलंदाजांना बाद करत भारतीय डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. जान्सनचा हा पराक्रम मागील दहा वर्षांत भारतीय भूमीवर एखाद्या दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरींपैकी एक ठरला आहे. यापूर्वी लान्स क्लुजनर, डेल स्टेन आणि काइल अॅबॉट यांनी भारतात अशा प्रकारचे पाच किंवा अधिक बळी घेतले होते. त्याचबरोबर तो भारतात कसोटीत पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील फक्त चौथा डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 1979 मध्ये जेफ डायमॉकनं कानपूर कसोटीत हा पराक्रम केला होता, तर त्याआधी जॉन लिव्हर आणि अॅलन डेव्हिडसन यांनीही अशीच चमकदार कामगिरी केली होती.
सामन्याच्या चित्रात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावातच 489 धावा करत भक्कम पाया रचला होता. त्यानंतर भारतीय संघ 201 धावांवर कोसळल्याने पाहुण्यांना 288 धावांची मोठी आघाडी मिळाली. दिवसअखेरीस ही आघाडी 314 धावांपर्यंत पोहोचली असून सामना साफपणे दक्षिण आफ्रिकेच्या हातात गेला असल्याचं चित्र आहे. दोन कसोटींच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका आधीच 1-0 ने आघाडीवर असल्यामुळे भारताला मालिका गमावण्याचा धोका आता अधिकच वाढला आहे.
भारतीय डाव संपल्यानंतर टेम्बा बावुमालाच फॉलो-ऑन देण्याची संधी होती, परंतु त्यानं ती वापरणं टाळलं. हे विशेष उल्लेखनीय आहे कारण भारतावर फॉलो-ऑन लादण्यासाठी लागणाऱ्या धावांच्या आघाडीत ही दुसरी सर्वोच्च आघाडी ठरली आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारतावर बांगलादेशविरुद्ध 299 धावांची सर्वाधिक आघाडी मिळाली होती. बावुमानं फॉलो-ऑन न देण्याचा निर्णय घेतल्याने आता सामना पुढे कसा वळण घेतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद करून सामना परत रुळावर आणण्यासाठी असामान्य प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा हा सामना एकतर्फी ठरेल अशी चिन्हं दिसत आहेत.








