खेर्डी-टेरव रस्त्याची दुरवस्था गंभीर; ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीकडे ठाम पाठपुरावा

चिपळूण, दि. ५ (प्रतिनिधी):  खेर्डी ते टेरव दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या मोठ्या प्रमाणावर खड्यांनी भरलेला असून, त्यामुळे प्रवाशांना दररोज अपघाताचा धोका आणि प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर खेर्डी परिसरातील देऊळवाडी, कातळवाडी, बौद्धवाडी तसेच मुख्य गावातील असंख्य ग्रामस्थांनी आज एकत्र येत प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला.
ग्रामस्थांनी सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता श्री. जी. एस. कुलकर्णी यांना रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीविषयी निवेदन सादर केले. त्यानंतर खेर्डी ग्रामपंचायतीत उपसरपंच श्री. अभिजीत खताते यांच्याकडे देखील निवेदन सुपूर्द करण्यात आले.
गणेशोत्सव जवळ येत असताना, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा आणि आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
निवेदन सादर करताना यशवंत लाड, सुनील गुरव, मंगेश पवार, सुप्रिया उतेकर, अनिल व महेंद्र फाळके, राजेंद्र व आनंद भुरण, अनिल शिंदे, मंदार कदम, सुरज गुरव, रमेश गुरव, समिधा तांदळे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या एकत्रित आवाजामुळे प्रशासनाकडून लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी आशा असून, जर दुरुस्ती लवकर झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

आणखी वाचा