रत्नागिरी, दि. 13 : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…. चुकले आमचे काही तर क्षमा असावी… पायी हळूहळू चाला मुखाने गजानना बोला… गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…लाडक्या बाप्पाला आर्त साद घालत कोकणात घरगुती गणपतीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात करण्यात आले. दुपारपासूनच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरात गावागावांमधून या मिरवणुकांना सुरुवात झाली होती.
ढोल, ताशा, बँजो, पथक ,लेझीम,टाळ असा या गौरी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींचा थाट होता. लहानांपासून थोरांपर्यंत विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या विसर्जन मिरवणुकांमध्ये गावोगावी चिमुकल्यांनी ठेका धरत केलेले नृत्य त्यामुळे या विसर्जन मिरवणुकींना वेगळा साज चढला होता. कोकणात या तीनही जिल्ह्यात मिळून सुमारे तीन लाख घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला.
रायगड जिल्हा श्रीवर्धन, हरिहरेश्वर येथे समुद्रकिनारी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आलं. रत्नागिरी शहराजवळ मांडवी व भाटये समुद्रकिनारी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले या ठिकाणी विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी गणपती बाप्पा असलेल्या विसर्जन वाहनांना परवानगी देण्यात आली होती. गुहागर समुद्र किनारी तसेच दापोली तालुक्यात हर्णै, दाभोळ कोळथरे येथे समुद्र किनाऱ्यावरती हे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही समुद्रकिनारा पट्टीवरील गावांमध्ये सागराच्या साक्षीनं बाप्पांचे विसर्जन करण्यात आले रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावे यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं होत. दापोली नगरपंचायत प्रशासनाकडून येणाऱ्या गणेशाभक्तांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली ,खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ,मालवण, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये विसर्जन मिरवणुका संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदा नगरपंचायतीच्या हद्दीत विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. जॅकेट घातलेले सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांकडून हे विसर्जन सुरक्षितरित्या करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांचे प्रशासन या सगळ्या विसर्जन मिरवणुकांवरती लक्ष ठेवून होते.