कोकणासाठी रेड अलर्ट; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी): राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून कोकण विभागावर त्याचा तीव्र प्रभाव जाणवू लागला आहे. हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस कोकणासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना प्रामुख्याने तीव्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह घाटमाथ्यांवरील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि ‘विफा’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे वातावरणात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असून उच्च ज्वाराचे संकेत दिले गेले आहेत. विशेषतः रायगड जिल्हा, जो सध्या रेड अलर्टवर आहे, तेथे काही भागांमध्ये जोरदार सरींचा अनुभव घेतला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र दुपारनंतर वातावरणात काहीशी उसंत मिळाल्याचे दिसले. तरीदेखील हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजचा व उद्याचा दिवस हा अति मुसळधार पावसाचा असून, नागरिकांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. डोंगराळ व खेड्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचेही चित्र आहे.
मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, समुद्रकिनारी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच घाटमाथ्यांवरील रस्ते, नद्या व धरणांवर नियंत्रण ठेवले जात असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या घाटमाथ्यांनाही पावसाचा धोका असल्यामुळे रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणीही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामानातील या बदलांमुळे शेतीच्या कामांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असून, किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी देखील समुद्रात न जाण्याचे निर्देश पाळावेत. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे हे सावट दोन दिवस कायम राहणार असून, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूरसदृश्य परिस्थिती आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेने सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा