कोकण रेल्वे कॉफी टेबल बुकचे अनावरण ; सचिन पिळगावकर यांच्या हस्ते सोहळा संपन्न

नवी मुंबई, दि. २० : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “कोकण रेल्वे कॉफी टेबल बुक” चे अनावरण नुकतेच एका विशेष समारंभात पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते श्री. सचिन पिळगावकर उपस्थित होते.
त्यांच्या सोबत श्री. संतोष कुमार झा (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – कोकण रेल्वे), श्री. सुनील गुप्ता (संचालक – संचालन व व्यावसायिक विभाग) आणि श्री. गिरीश करंदीकर (मुख्य जनसंपर्क अधिकारी) यांचाही कार्यक्रमास मान्यवर सहभाग होता. हा सोहळा कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्य कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ही कॉफी टेबल बुक कोकण रेल्वेच्या अद्वितीय अभियांत्रिकी पराक्रम, निसर्गरम्य सौंदर्य आणि पश्चिम किनारपट्टीवरील तिच्या परिवर्तनशील प्रभावाचे दस्तऐवजीकरण करणारा एक दृश्यकाव्यात्मक दस्तऐवज आहे. या पुस्तकात मोहक छायाचित्रे आणि रंजक वर्णनांद्वारे कोकण रेल्वेच्या धाडसी संकल्पनेपासून तिच्या प्रत्यक्ष अस्तित्वापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वे ही केवळ एक रेल्वेमार्ग न राहता पश्चिम किनारपट्टीसाठी जीवनवाहिनी ठरली आहे, याचा ठसा या पुस्तकात उमटतो. देशभरातील विविध प्रतिष्ठित पायाभूत प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे कोकण रेल्वेने एक अग्रगण्य पायाभूत संस्था म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे, याचे दर्शनही हे पुस्तक घडवते.

आणखी वाचा