कोकण सुकन्येची अमेरिकन सैन्यदलात निवड; दापोलीच्या प्राजक्ता भांबुरे-बोंगाळेची उल्लेखनीय कामगिरी

दापोली, दि. २९ : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे (सारा बोंगाळे) यांनी अमेरिकेच्या सैन्यदलात (US Army) निवड होऊन कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अमेरिकन सैन्याच्या अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आठ महिन्यांच्या प्रशिक्षणाला यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी अधिकृत पदवी (Graduation) प्राप्त केली. सध्या त्या अमेरिकन सैन्यदलाच्या मेडिकल विभागात सेवा बजावत आहेत.

या प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ताने उत्कृष्ट नेमबाजीचे कौशल्य दाखवत ‘मार्क्समनशिप’ पदक पटकावले. तसेच संपूर्ण प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवत त्यांनी आणखी एक मानाचा बहुमान मिळवला.

प्राजक्ताचे शालेय शिक्षण दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून बी.एस्सी. आणि मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून एंडोक्रिनॉलॉजी (Endocrinology) विषयात एम.एस्सी. पदवी त्यांनी संपादन केली. विवाहानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या.

लहानपणापासूनच सैन्यात दाखल होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. मात्र एका अपघातामुळे हे स्वप्न काही काळासाठी अपूर्ण राहिले. तरीही त्यांनी हार न मानता स्वतःची जिद्द कायम ठेवली. अमेरिकेत कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर सैन्याच्या कठोर प्रशिक्षणाला सामोरे जात यश संपादन केले.

सैन्यात कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही प्राजक्ताने स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर हा टप्पा गाठला. अमेरिकेत त्या क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. तसेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्स मिलेट्स अॅम्बेसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील आवड जोपासताना त्यांनी ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा प्रतिष्ठेचा किताबही पटकावला.

संशोधन, मॉडेलिंग आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करत असतानाही सैन्यदलात दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी जिवंत ठेवले. अखेर अथक परिश्रम, चिकाटी आणि देशसेवेच्या भावनेच्या जोरावर अमेरिकन सैन्यदलात स्थान मिळवत प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे यांनी दापोलीसह संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.

आणखी वाचा