मुंबई, दि. ०७ : ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारितेतील ५४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीने सजलेले व्यक्तिमत्त्व असलेल्या कुमार कदम यांना यंदाचा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघ आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या श्री. शिरीष पै यांच्या देणगीतून देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रुपये ११,०००/- व सन्मानचिन्ह असे आहे.
कुमार कदम यांनी १९७२ मध्ये ‘रत्नभूमि’ या रत्नागिरीतील स्थानिक दैनिकातून पूर्णवेळ पत्रकारितेची सुरुवात केली. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि शाळांमधील सक्तीच्या देणग्यांविरोधात त्यांनी विद्यार्थीदशेतच ‘लोकसत्ता’मधून आवाज उठवला. त्यांच्या लेखांनी समाजमनाला चटका लावला.
त्यांनी ‘साप्ताहिक मार्मिक’, ‘हिंदुस्थान समाचार’, ‘दैनिक पुढारी’, ‘दैनिक तरुण भारत’, आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या संस्थांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. विशेषतः ‘मराठी मुलखात कोकण’ या सदरामधून त्यांनी कोकणातील सेझ प्रकल्प, पर्यावरणीय संकटे, कोकणातील उद्योगधंद्यांची घुसळण, यावर रोखठोक भूमिका मांडली. ‘महामुंबईचे महाजाळ’ हे २२ ऑगस्ट २००५ रोजीचे त्यांच्या सदरातील लेख विशेष गाजले, ज्यातून रायगडातील सेझ प्रकल्पावर पहिला प्रकाश टाकला गेला.
१९८३ साली दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रमांची गळचेपी थांबवण्यासाठी त्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला, त्यात सुधीर फडके यांच्यासारखे दिग्गज सहभागी झाले. यामुळे सह्याद्री वाहिनीवरील मराठी कार्यक्रमांना अधिक वाव मिळाला.
सध्या ते अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे काम करतात तसेच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात. त्यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता समाजाच्या व्यापक हितासाठी केंद्रस्थानी राहिले आहे.
कुमार कदम यांना मिळालेला हा पुरस्कार मराठी पत्रकारितेतील एक मोलाची पावती मानली जात असून, त्यांचा पत्रकारितेतील ठसा, सडेतोडपणा, आणि सामाजिक भान यामुळे ते पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श आहेत.