चिपळूण, दि. ०२ (प्रतिनिधी): कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुंभार्ली घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका धोकादायक वळणावर सुमारे २० फूट रस्ता खचल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रस्त्याखालची मातीही मोठ्या प्रमाणात सरकत असल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून, वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा मोठा परिणाम घाट परिसरावर झाला आहे. सततच्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती सैल झाल्याने रस्त्याचा काही भाग खचला आहे. या घटनेमुळे कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांसह एसटी बस, मालवाहू ट्रक आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघाताचा धोका लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी वाहनांचा वेग कमी ठेवण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही घाटातील धोकादायक वळणांवर कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीवरच भर दिल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. घाटातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षणभिंत उभारावी, वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी आणि धोकादायक भागात इशारा फलक व बॅरिकेड्स उभारावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने कुंभार्ली घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी शक्यतो दिवसाच्या वेळेतच प्रवास करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









