‘लेक लाडकी’ योजनेत मुंबईतील ३,५६३ मुलींना लाभ

मुंबई शहरातील ६७१, तर उपनगरातील २,८९२ लाभार्थी

मुंबई, दि. २८ : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचा जन्मदर वाढविणे, शिक्षणाला चालना देणे तसेच कुपोषण, बालविवाह आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाची ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ६७१ आणि मुंबई उपनगरातील २ हजार ८९२ अशा एकूण ३ हजार ५६३ लाभार्थींना आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही सुधारित योजना अधिक्रमित करून राज्यात १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात आली. पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर ६ हजार रुपये, इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७ हजार रुपये आणि इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ८ हजार रुपये दिले जातात. मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अंतिम टप्प्यात ७५ हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना मिळू शकतो. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी या योजनेसाठी पात्र राहते. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अंतिम लाभ मिळण्यासाठी मुलीने १८ वर्षे पूर्ण केलेली आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्मदाखला, मुलगी व पालकांचे आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत तसेच संबंधित शैक्षणिक टप्प्याचा बोनाफाईड दाखला आवश्यक आहे. नियमानुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्रही सादर करावे लागते.

पात्र पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्यामार्फत कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी केली जाते. त्यानंतर लाभार्थीची माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवून संबंधित स्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो.

पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत पालकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी : https://icds.gov.in/en/schemes/lek-ladki-yojana

आणखी वाचा