**महाराष्ट्रात हुडहुडी! तापमानाचा पारा घसरला

कडाक्याची थंडी वाढली; हवामान खात्याचा इशारा

पुणे, दि. १० : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना पोषक वातावरण मिळाल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट झाली असून नागरिकांना पहाटे आणि सकाळच्या वेळी हुडहुडी भरत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस हेच चित्र कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुण्यात शुक्रवारी पहाटे ८.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर एनडीए आणि हवेली भागात ६.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. पहाटे कडाक्याची थंडी जाणवत होती, तर दिवसभरही हवेत गारवा कायम राहिला. ऊन पडूनही थंडीचा जोर फारसा ओसरला नाही. दिवसभरात पुण्यात २७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गेल्या आठवड्यात पुण्यात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. किमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त होते आणि ढगाळ वातावरणामुळे थंडीने तात्पुरती विश्रांती घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे पुणेकरांनी काहीसा दिलासा घेतला होता. मात्र बुधवारी तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली गेल्यानंतर गुरुवारी आणखी घट नोंदवली गेली. शुक्रवारी सकाळी थंडीमुळे नागरिक स्वेटर, जॅकेट घालून बाहेर पडताना दिसले.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव कायम असून निफाड तालुक्यात थंडीने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप

श्रीनगर :
काश्मीर खोऱ्यात शीतलहरीचा तीव्र प्रभाव जाणवत असून तापमानात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली. तापमान ४.१ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरले असून, त्यामुळे दल तलावाचा आतील भाग गोठल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

पहलगाममध्ये तापमान ७ अंशांच्या खाली, कुपवाडामध्ये ५.८ अंश, तर सोनमर्गमध्ये ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले आहे. काश्मीर खोऱ्यात पुढील काही दिवस तीव्र थंडी कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

———————————————————————————–
जाहिरात

श्री. अमेय परुळेकर, सामाजिक कार्यकर्ता, रत्नागिरी यांचे कडून रत्नागिरी शहरातील (नगरपरिषद हद्दीमधील) विध्यार्थी/विद्यार्थिनी व बेरोजगार यांचेसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम..

आणखी वाचा