सद्यस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची गरज – खा. डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, राज्यस्तरिय अधिवेशन 2024 चिंचवडमध्ये ; रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर व उपाध्यक्ष राकेश खराडे सन्मानित

चिंचवड, दि. १८ (विशेष प्रतिनिधी) : लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या स्तंभाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे केले. पत्रकारांनी बरं नव्हे तर खरं लिहिले पाहिजे, असे सांगुन पत्रकार कोणत्याही पक्ष विचारांचा नसतो तो फक्त बातमीचा असतो, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्षीय समारोपात केले. याप्रसंगी सलग पाच वर्षे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळून विविध उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तसेच निर्भिड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024  रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथील पत्रकार राकेश खराडे यांना रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाची नियुक्ती जाहिर करीत सन्मानित करण्यात आले.

चिंचवड येथे शनिवार दिनांक 16 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप झाला. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झालेल्या अधिवेशन समारोपला खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री, आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार महेश लांडगे, आदी मान्यवरांची उपस्थिती झाला. उद्धाटन सकाळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, यांच्या उपस्थितीत झाले. समारोपात कामगारांचे लढवय्ये नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, भोसरी मतदार संघाचे महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आ. उमा खापरे, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी, पत्रकारितेच्या क्षेत्रात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चैनल, यूटयूब चैनल, डिजिटल माध्यमं उदयास येत असून डिजिटल मिडीया सोशल मिडीयादेखील चांगल्यातऱ्हेने जनजागृती करीत असल्याचे सांगितले. यावेळी ‘अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम’ या परिसंवादात प्रसिध्द लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव सहभागी झाले. यावर चर्चा करताना माध्यमांना आज सर्दी झाली आहे का? आजचा निर्भिड पत्रकार कोण? पत्रकारांवर कोणकोणत्या प्रकारचे दबाव असतात? पत्रकारितेत युटयूब महत्त्वाचा रोल निभावत आहे का? शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचे प्रश्न माध्यम निष्पक्ष मांडतात का? यावर मान्यवरांनी आपली निर्भिड मते मांडली. हा परिसंवाद रंगतदार ठरला.  प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी, सर्व जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन व्यापक निर्माण जाळे निर्माण करून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध स्तरांवरील संघटना कार्यरत करण्याची भुमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी, अलिकडे राजकीय लोक पत्रकारांनाही हा या विचाराचा तो त्या नेत्याचा अशी विभागणी करतात. मात्र, पत्रकार कोणाचाच नसतो; तो केवळ बातमीचा असतो. बरं लिहिण्यापेक्षा खरं लिहिणे जास्त अपेक्षित आहे. वृत्तपत्रांचे अर्थकारण यावरही मंथन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात पंचवीस हजाराहून अधिक अधिक पत्रकार सदस्य आहेत. त्यांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यरत आहे. सर्वाधिक सदस्य संख्या असलेला ही राज्यातील एकमेव संघटना आहे, असे सूतोवाच केले.

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी, पत्रकारांच्या जीवनामध्ये नेहमीच संघर्ष व लेखणीतून लढाया असतात. राज्यातील सर्व पत्रकार एका ठिकाणी पाहण्याचा हा पहिलाच योग असावा पत्रकार हा समाजातील विविध प्रकारच्या समस्यांची नाडी जाणणारा डॉक्टरच असतो. त्यामुळे त्याने निर्भयपणे उत्तम लिखाण मांडावे. जेणेकरून सामाजिक हित जपण्यासाठी मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांचे शुभेच्छा संदेश

चिंचवड येथे पार पडलेल्या राज्य अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याप्रती आतापर्यंत सर्वाधिकवेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार झाल्याने टीका झाल्याचे सांगून अधिवेशनाला शुभेच्छा दर्शविल्या तर राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हाने आहेत. लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी निर्भीड पत्रकारिता आवश्यक आहे, असे मत मांडले.

आमदार बच्चू कडू यांनी, एक सामान्य घरातील कार्यकर्ता ते आमदार होणं हे पत्रकारांमुळे शक्य झाले मात्र आज जाहिरात व पत्रकारिता याची रसमिसळ होत आहे. त्यामुळे चांगल्या पत्रकारांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी हातातील लेखणी मजबूत असावी असा सल्ला दिला.

यावेळी उत्कृष्ट निर्भिड पत्रकारिता पुरस्कार रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, विवेकवादी पत्रकारिता हिना कौसरखान देशमुख, आश्वासक पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर, उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळूसकर, युध्दवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे, प्रेरणादायी पत्रकारिता सतीश नवले, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषि पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सद्रक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रविण बिडवे, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भिड पत्रकारिता अमोल काकडे तसेच वाशिम रत्न पत्रकारिता निलेश सोमाणी,उत्कृष्ठ पत्रकारिता अमोल यलमार यांच्यासह य्रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनाही गौरविण्यात आले. उपस्थित सर्व पत्रकारांना संघाकडून पत्रकारितेसाठी उपयोगी डायरी व बॅग भेट देण्यात आली. संपूर्ण राज्यातून हजारो पत्रकारांची लावलेली हजेरी लक्ष वेधून घेत होती.

आणखी वाचा