माणगाव बायपासवर दिशादर्शक फलकांचा अभाव

एकदिशा मार्ग सुरू; मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांची दिशाभूल, रात्री प्रवाशांना भीतीदायक अनुभव

रायगड, दि. २१ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवानंतरच्या परतीच्या प्रवासात माणगाव-इंदापूर परिसरातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला असला तरी माणगाव बायपासवर दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. बायपासची एक लेन सुरू करण्यात आली आहे; मात्र तेथून मुंबई-ठाण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी स्पष्ट माहिती देणारे फलक नसल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले हजारो चाकरमानी महामार्ग आणि कोकण रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. माणगाव आणि इंदापूर परिसरातील बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यातच सुरू करण्यात आलेल्या बायपास मार्गावर योग्य दिशादर्शक व्यवस्था नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.

परतीच्या मार्गावर माणगाव बायपासवरून पुढे गेल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना उजव्या बाजूने खाली उतरण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, बायपासवरून उतरल्यानंतर मुंबईच्या दिशेने नेमके कोणत्या मार्गाने जायचे, याची माहिती देणारे स्पष्ट फलक किंवा अन्य व्यवस्था नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेषतः सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी या परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांना अडचणी येत आहेत.

एका वाहनचालकाने सांगितले की, बायपासवरून खाली उतरल्यानंतर पुढील मार्गाबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने काही अंतर चुकीच्या दिशेने जावे लागले. अखेर पेट्रोलपंपावर विचारणा केल्यानंतर खालापूर टोलनाक्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग समजला. रात्रीच्या वेळी अपरिचित आणि सामसूम रस्त्यावरून असा प्रवास करणे चिंताजनक असल्याचे त्याने सांगितले.

कणकवली येथील प्रवासी गिरीश सावंत आणि मंदार मराठे यांनी माणगाव बायपासवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तातडीने दिशादर्शक फलक बसवावेत, तसेच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. महामार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असताना अशा मूलभूत सुविधांचा अभाव राहणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कोकण रेल्वेवरही परतीच्या प्रवाशांची गर्दी

दरम्यान, सोमवारी महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असली तरी कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्या गर्दीने फुल्ल आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात येण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच खेड येथून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

मात्र, मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसमधील अस्वच्छता आणि कोकण रेल्वेवरील गाड्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. तसेच पूर्वीप्रमाणे दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस दिवा स्थानकाऐवजी पुन्हा दादर या मध्यवर्ती स्थानकावरून सुरू करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.

आणखी वाचा