रत्नागिरी, दि. ११: मराठा बिझनेसमन फोरम, रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने नूतन नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच रत्नागिरी येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी आयोजित नेटवर्किंग बैठकीत सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. रत्नागिरीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान सौ. शिल्पाताई सुर्वे यांना मिळाल्याबद्दल मराठा बिझनेसमन फोरमच्या वतीने विशेष अभिमान व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधत स्थानिक उद्योजकांच्या विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योग, व्यापार आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाज उद्योजकतेकडे वळावा व स्वबळावर आर्थिक प्रगती साधावी या उद्देशाने कै. ॲड. आप्पासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून मराठा बिझनेसमन फोरमची स्थापना करण्यात आली आहे. बेंगळुरू, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आदी ठिकाणी विविध चॅप्टरच्या माध्यमातून फोरमचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे.
मराठा बिझनेसमन फोरम, रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे उद्योजकांच्या नियमित नेटवर्किंग बैठका आयोजित केल्या जातात. रत्नागिरीतील मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने या फोरममध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायवृद्धीसाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फोरमचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.








