महावितरणच्या सेवा संकल्प अभियानाची सुरुवात

रत्नागिरी, दि. 24 सप्टेंबर 2026–  सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करणे, तसेच प्रलंबित घरगुती वीज जोडण्या आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तत्परतेने निवारण करणे या उद्देशाने महावितरणच्या वतीने 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ मोठ्या उत्साहात व व्यापक स्वरूपात राबवले जात आहे.

रत्नागिरी मंडलात रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख, चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड येथील विविध क्षेत्रात या अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत महावितरणद्वारे पात्रतेनुसार प्रलंबित घरगुती वीज जोडण्यांना तातडीने मंजुरी दिली जात आहे. वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या पण तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. याशिवाय ग्राहक किंवा मालमत्ताधारकांच्या तपशिलांचे अद्ययावतीकरण (Update) करण्याचे कामही या अभियानादरम्यान केले जात आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी सौर योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना’ व ‘स्वयंपुर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART)’ योजना अंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून अर्ज भरण्यास मोफत सहकार्य केले जात आहे. तसेच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ या शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेतील सर्व प्रलंबित अर्जांवर त्वरित आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. यासोबतच ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत बळीराजाला आणि शेतीपंपांना दिवसा अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जलद गतीने कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिक आणि वीज ग्राहकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी अभियानात विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर वीज भार (Load) बदलणे, वीज बिलांविषयीच्या तक्रारी, नादुरुस्त मीटर किंवा सरासरी बिलिंग होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निरसन करणे आणि विविध ग्रामपंचायती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अपघातप्रवण  ठिकाणांच्या अर्जांवर तातडीने उपाययोजना करणे यांचा देखील यात समावेश आहे.

या शिबिरात प्राप्त सुचना व अर्जाच्या अनुषंगाने अपघातमुक्त व सुरक्षित वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट केले जाणार आहे. लोंबकळणाऱ्या धोकादायक तारा सुव्यवस्थित करणे, वाकलेले विद्युत खांब सरळ करणे, रोहित्रांच्या उघड्या पेट्यांना झाकणे बसवणे आणि स्पेसर बसवण्याची व्यापक मोहीम हाती घेतली जाईल. तसेच नादुरुस्त रोहित्र विहित मुदतीत बदलून देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

तालुका स्तरावर आयोजित शिबिरांमध्ये महावितरणकडून समर्पित स्टॉल्स व किऑस्क उभारले आहेत. या स्टॉल्सवर सहाय्यक अभियंता किंवा कनिष्ठ अभियंत्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. स्टॉलवर आलेल्या नागरिकांची जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी करून घेतली जात असून मोबाईल ॲप्लिकेशनचे थेट प्रात्यक्षिक आणि दृकश्राव्य चित्रफितींद्वारे  योजनांच्या फायद्यांची माहिती दिली जात आहे. ग्राहकांना आर्थिक सहाय्य आणि कर्ज सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि पॅनेलवरील अधिकृत विक्रेते  शिबिरात उपस्थित राहून थेट मदत करीत आहेत.

बुधवारी (दि. 23 सप्टेंबर) या अभियानाला तब्बल 187 नागरिकांनी भेट दिली, त्यात ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना’ मध्ये सहभागी झालेल्या 5 ग्राहकांनी या योजनेबद्दल केंद्रशासन आणि महावितरणची प्रशंसा केली तर 9 ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करित नोंदणी केली. महावितरणच्या या लोककल्याणकारी महाअभियानात सर्व वीज ग्राहक, शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि आपल्या वीजविषयक समस्या सोडवून घेऊन सौर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.

आणखी वाचा