मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेला असल्याने या महामार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. नुकतेच या मार्गावर उभ्या असलेल्या कदम ट्रॅव्हलचां मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने एक मृत्यू तर 9 जण प्रवासी जखमी झाले. पावसाळ्यात या मार्गावर दरड कोसळने आणि वाहने धडक लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच अनेक वर्षापासून हा महामार्ग रखडलेला असून तो पूर्णत्वास नेण्यात यावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते रामशेठ रींगे , गणेश शितोळे , अनिकेत रिंगे यांनी भेट घेऊन मागणी केली. आज मुंबईतील देवगिरी येथील शासकीय बंगल्यावर ही भेट घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची प्रतिमा रेखाटलेली फ्रेम भेट म्हणून देण्यात आली.
विकासाच्या मुद्यावर आम्ही कायम समर्थपणे अजित दादा पवार यांच्या बरोबर आहोत आणि कायम सोबत राहू अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम रिंगे यांनी दिली. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. त्यानिमित्त आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांची भेट घेतली आणि हा महामार्ग तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. रायगड मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे हा महामार्ग लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा कोकणवासीयांना आहे.








