मुंबई, दि. २६ : राज्य शासन नाभिक समाजाच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने समाज बांधवांत तीव्र नाराजी आहे. शासनाने नाभिक समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करावेत, समाजाचे युवा तरुणवर्गासाठी रोजगार, नोकरी योजना राबविण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी सकल नाभिक समाजातर्फे आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव व सरचिटणीस महेंद्र जाधव यांनी केले आहे.
समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो, ही एक शोकांतिका आहे. शासनाच्या वतीने विविध समाज घटकांना शासन योजनांचा लाभ दिला जातो. मात्र नाभिक समाजाला उदरनिर्वाह चालवण्यासाठी केशकर्तनालय सुरू करण्याकरिता लागणारे भांडवल गोळा करताना बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, अशी खंत सरचिटणीस मयुर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
नाभिक समाज हा शहर व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. तेथे राहून बहुतांश समाज बांधव आजही आपला पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. पारंपरिक केशकर्तनाच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या समाजाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कोणत्याही शासकीय सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत. त्याचा फटका नाभिक समाजाला बसत असल्याची माहिती नाभिक समाजाचे राष्ट्रीय नेते अरुण जाधव यांनी दिली.