ग्रामपंचायत नाचणेचा ६६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा : महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचा जल्लोष

रत्नागिरी, दि. ०४ : ग्रामपंचायत नाचणे (ता.जि. रत्नागिरी) हिचा ६६ वा वर्धापन दिन दि. २९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ठरविण्यात आलेल्या सात उद्दिष्टांच्या अनुषंगाने गावातील महिला बचतगट, तळागाळातील महिला आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दि. २९ ऑक्टोबर रोजी “हा खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” या महिला विशेष कार्यक्रमाने वर्धापनदिन साजऱ्याची सुरुवात झाली. ओम साई मित्र मंडळ हॉल, साळवीस्टॉप येथे झालेल्या या कार्यक्रमात गावातील १०८ महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुष्का यादव यांनी प्रथम, उर्मिला यादव यांनी द्वितीय, तर स्वप्नजा भोरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आकर्षक पैठणी साडीचा पुरस्कार पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नागिरीतील उगवती कलाकार तन्वी सावंतदेसाई यांनी केले.

पुढील दिवशी, ३० ऑक्टोबर रोजी पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणगौरव सोहळा पार पडला. “मिश्र डाळींपासून एक पदार्थ तयार करा” या विषयावर आयोजित पाककला स्पर्धेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. परीक्षक म्हणून श्रीम. तेरेदेसाई यांनी काम पाहिले. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला, तरुण-तरुणी, अंगणवाडीतील मुले-मुली यांनी नृत्य, गीते आणि नाटिकांद्वारे रंगत आणली. १० वी व १२ वी मध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीने कांदळवन बचत गटा च्या “कयाकिंग व खाडी सफारी” या राज्यपुरस्कृत उद्यमाला विशेष गौरविले. तसेच गावातील विविध सामाजिक मंडळे, रक्तदान शिबिरे, आरोग्य उपक्रम राबविणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे कार्यरत संघाचे आणि महिला भजन मंडळाचेही कौतुक करण्यात आले. स्किल इंडिया योजनेंतर्गत ग्राफिक डिझायनर कोर्स पूर्ण केलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे नाचणे गाव दत्तक घेऊन “पाणी अडवा, पाणी जिरवा”, स्वच्छता व भिंती रं

गविणे यासारखी कामे केल्याबद्दल संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. २०२५-२०२६ मध्ये घरपट्टी सर्वात प्रथम भरणाऱ्या खातेदार श्रीराम गोखले यांचा विशेष गौरव झाला.

कार्यक्रमात सरपंच ऋषीकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य सुचिता घडशी, सिद्धी सुपल, प्रिती रसाळ, विभावरी नागवेकर, शिवानी रेमुळकर, रेश्मा कोळंबेकर, शुभम सावंत, विनेश गार्डी, माजी जि.प. समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमा मेस्त्री यांनी केले.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण महापूजेने या उत्सवमालिकेची सांगता झाली. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत तिर्थप्रसादाचा लाभ घेत वर्धापन दिनाचा समारोप आनंदमय वातावरणात झाला.

आणखी वाचा