Mumbai Marathi Patrakar Sangh : ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाने रंगभूमीला नवी दिशा – अरुण नलावडे

मुंबई, दि. २६ (अंकुश कदम): “प्रायोगिक रंगभूमीच्या जपणुकीसाठी पत्रकार संघ पुढे सरसावतो, ही गोष्टच अविश्वसनीय आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे उद्घाटन करताना भावना व्यक्त केल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी नाट्यप्रयोग सादर होणार असून, प्रेक्षकांना मोफत प्रवेश असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दर्जेदार प्रायोगिक नाट्यकृतीसाठी व्यासपीठ
प्रायोगिक रंगभूमीसाठी उभारण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, लेखक-दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर, इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख डॉ. अभिषेक कुमार, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, तसेच नाट्य शुक्रवार समितीचे सदस्य रवींद्र देवधर व नयना रहाळकर उपस्थित होते.
‘मी भारतीय’ या दीर्घांकाने सुरुवात
‘मी भारतीय’ या प्रदीप तुंगारे लिखित आणि रवींद्र देवधर दिग्दर्शित दीर्घांकाने ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाची सुरूवात झाली. यामध्ये अभिनेता ऋषिकेश कानडे यांच्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नाट्यसंस्थांना मोफत सभागृह आणि आर्थिक अनुदान
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नाट्यसंस्थेला मोफत सभागृह आणि ₹१०,०००/- चे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पत्रकार संघात देवदास मटाले, रवींद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
संघटनांचा, संस्थांचा सन्मान
दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी “संदीप चव्हाण यांनी एक रंगकर्मी म्हणून जी कल्पना मांडली, ती नव्या पिढीच्या रंगकर्मींना चालना देणारी आहे,” असे सांगून आभार मानले. डॉ. अभिषेक कुमार यांनी इंडियन ऑईलकडून या उपक्रमासाठी कायम पाठींबा राहील, असे आश्वासन दिले. रवींद्र देवधर यांनी याला “पथदर्शी उपक्रम” असे संबोधले.
संपर्कासाठी आवाहन
आपल्या नाट्यकलाकृती सादर करू इच्छिणाऱ्या संस्थांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रवींद्र देवधर (९४२२३४४५५५) किंवा नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी यावेळी केले.

आणखी वाचा