मंडणगड, दि. १३ (प्रतिनिधी): “भाऊ, आपल्या मंदिरात झालेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पाठव…” – एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या रोशनीचा हा शेवटचा संदेश सख्ख्या चुलत भावाला विनायक सोनघरे याला आला आणि त्यानंतर काही तासांत तिच्या अपघाती मृत्यूची दुःखद बातमी गावात पोहोचली.
हसतमुख, मनमिळावू आणि जिद्दीने गरिबीवर मात करून उंच भरारी घेणारी रोशनी, मंडणगड तालुक्यातील बुरी गावची शान होती. ७ जून रोजी ती आई-वडिलांसोबत गावी आली होती आणि दुसऱ्या दिवशी, ८ जून रोजी ग्रामदैवताच्या उत्सवात उत्साहाने सहभागी झाली होती.
“तीने कार्यक्रमातील व्हिडिओ पाहून १० जूनला मला सकाळी मॅसेज केला. तो मॅसेज तिचा शेवटचा ठरेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं…” असे सांगताना विनायकच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “ती सख्ख्या बहिणीसारखी होती. माझी चौकशी केली, पुन्हा भेटू असं म्हणाली… आणि हीच शेवटची भेट ठरली.”
ग्रामदैवताच्या उत्सवात तीने रांगोळी काढली, डान्स कार्यक्रमात भाग घेतला. तिची चुलत बहिण, वहिनी यांच्यासोबत ती हसत खेळत होती. तिच्या आठवणी सांगताना संपूर्ण सोनघरे कुटुंब व्याकुळ झालं. गावातील काका, काकू, आजी, आजोबा, सगळ्यांचा कंठ दाटून आला.
गावाची शान, कुटुंबाचा अभिमान…
“रोशनी आमच्या गावाचा अभिमान होती. तिच्या यशामुळे आम्ही सार्थ अभिमान बाळगत होतो. आमच्या घरात कुणीही एवढं मोठं झालं नव्हतं, पण ही मुलगी एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती,” असं सांगताना तिचे काका अनंत सोनघरे आणि आजोबा कृष्णा सोनघरे यांचा हुंदका आवरत नव्हता.
चार दिवसांपूर्वीच ती गावात आली होती. प्रत्येकाला भेटली, हसली, आणि अचानक काळाने तिच्यावर झडप घातली. तिच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गाव, कुटुंब आणि आप्तेष्टांना गहिवरून टाकलं आहे. सोनघरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.