रत्नागिरी (खंडाळा), दि. ०१ (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. समीर बोरकर होते, तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थिनी आराध्या कोळंबेकर, मानवी खेडेकर आणि शौर्य चव्हाण यांनी टिळकांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे दिली. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर शाहीर प्रसाद विभुते यांनी पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. ईश्वर मगर सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत टिळक व साठे यांच्या कार्याचे व विचारांचे महत्व पटवून दिले. “टिळकांचा देशप्रेमाचा संदेश आणि साठेंचे वास्तववादी साहित्य हे फक्त वाचण्यापुरते न ठेवता आचरणात आणण्याची आज गरज आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धोपट सर यांनी तर आभारप्रदर्शन सुनील कांबळे सर यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.