चिपळूण, दि. ०४ (प्रतिनिधी): महावितरण चिपळूण विभागाच्या अनागोंदी, मनमानी व गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत आज अधिकृत निवेदन सादर करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वीजसमस्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास उग्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात स्मार्ट मीटर बसवण्यातील जबरदस्ती, वारंवार वीज खंडित होणे, चुकीच्या बिलांमुळे निर्माण होणारा संभ्रम, तसेच नगरपरिषद व महावितरणमधील वादाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणं या मुद्यांचा समावेश करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनातील मुख्य मुद्दे –
-
स्मार्ट मीटरची सक्ती नागरिकांच्या सहमतीशिवाय होत असून याविरोधात नागरिकांत असंतोष आहे.
-
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे शैक्षणिक, वैद्यकीय व व्यवसायिक कामांवर परिणाम होत आहे.
-
नगरपरिषद व महावितरणमधील वादाचा फटका नागरिकांना बसतोय – उपकेंद्र बंद करून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जातोय.
-
चुकीची बिले, सेवा केंद्रातील दिरंगाई आणि तांत्रिक त्रुटी, यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात.








