पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशन रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षपदी नगमा वारुणकर

संगमेश्वर, दि. ८ : रत्नागिरी पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशन या नोंदणीकृत संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी कसबा गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या नगमा आर. वारुणकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र आर. चौधरी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नियुक्तीपत्र त्यांना अलीकडेच प्रदान करण्यात आले.
या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक व पोलिस क्षेत्रात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. नगमा वारुणकर यांचे विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून अभिनंदन होत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
नगमा वारुणकर यांचे माहेर चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे असून सध्या त्या संगमेश्वर तालुक्यात सासरी वास्तव्य करतात. शिक्षणाबरोबरच समाजकार्यातील त्यांची आवड आणि लोकांशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महिलांचे प्रश्न असोत, शिक्षणाविषयी जागृती असो किंवा सामाजिक प्रश्नांवर लढा असो—नेहमी आघाडीवर राहून काम करण्याचा त्यांचा पक्का पायंडा आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण धडपडीची आणि कामावरील निष्ठेची दखल घेत फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जिल्हा महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पदावरून त्या संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करतील, तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद व विश्वासाचे बंध दृढ करण्यासाठी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“संघटनेच्या कामाला गती देणे, पोलीस मित्र फाउंडेशनची उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पोलिसांबरोबरच नागरिकांच्या अडचणींना आवाज देणे हे माझे प्राधान्य असेल. संघटना आणि समाजाच्या प्रगतीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा विश्वास नवनियुक्त जिल्हा महिला अध्यक्ष नगमा वारुणकर यांनी व्यक्त केला.
एका महिलेला या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे पेलण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
नियुक्तीनंतर नगमा वारुणकर यांचे प्रत्यक्ष भेटून, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून—व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांवरूनही मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे. महिलांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत असून, या निवडीमुळे फाउंडेशनचे कार्य नक्कीच नवे बळ घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा