चिपळूण, दि. २ सप्टेंबर : सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम होते. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजेशिर्के यांना पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले होते. महिनाभरात महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यावर झालेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे चिपळूण महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
सातबारा उतारा आणि फेरफाराच्या कामांसाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.








