१२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत; कशेडी घाटातील दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

रत्नागिरी, दि. ६ : मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील खवटी परिसरात नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्री कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे तब्बल १२ तास वाहतूक ठप्प राहिली. जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविल्यानंतर सोमवारी दुपारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

रविवारी मध्यरात्री सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान खवटी मंडलिक कोंड ते हॉटेल अनुसया परिसरात डोंगरावरील मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे महामार्गावर कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. या घटनेत परिसरातील चार घरांचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर सोनवणे, प्रांताधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, महावितरणचे कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

महामार्ग बंद राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि हजारो प्रवासी अडकून पडले. सुरक्षेच्या कारणास्तव दरडीलगतच्या घरांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सततचा पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मदतकार्य अत्यंत सावधगिरीने राबविण्यात आले.

दुपारी १.५५ वाजता मुंबईच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर गोव्याच्या दिशेनेही टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र दरड हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, महामार्गावर रात्रभर अडकून पडलेल्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू होण्यास झालेला विलंब, पिण्याच्या पाण्याची व अन्य सुविधांची कमतरता तसेच काही ठिकाणी वस्तूंची जादा दराने विक्री होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांसाठी तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

आणखी वाचा