रत्नागिरीतील फगरवठार येथे पुन्हा दरड कोसळली; रस्त्याचा मोठा भाग खचला

वाहतुकीसाठी मार्ग बंद; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी, दि. ६ (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरालगतच्या फगरवठार परिसरात गुरुवारी पुन्हा एकदा दरड कोसळल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला असून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे, याच ठिकाणी यावर्षीच्या पहिल्याच पावसात दरड कोसळली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, कायमस्वरूपी संरक्षणात्मक कामे न झाल्याने पुन्हा दरड कोसळून रस्ता खचल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरड कोसळल्यामुळे परिसरातील काही घरांनाही धोका निर्माण झाला असून, मुसळधार पाऊस कायम राहिल्यास आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील रहिवासी प्रत्येक पावसाच्या सरीसोबत धास्तावलेल्या अवस्थेत जीवन जगत आहेत.

घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत असून दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

फगरवठार परिसरात वारंवार दरडी कोसळत असल्याने या ठिकाणी भूवैज्ञानिक सर्वेक्षण करून मजबूत संरक्षक भिंत, उतार स्थिरीकरण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

“एखादी मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला असून, पावसाळा संपण्यापूर्वी या धोकादायक ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

आणखी वाचा