रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवस्तीतील धनजीनाका परिसरातून एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अजबा अलीसाहेब मुकादम (वय १४) असे अपहृत मुलीचे नाव असून, ती सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी निघाली; मात्र दुपारी घरी पोहोचलीच नाही. यानंतर तिच्या अपहरणाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजबा ही मुरुगवाडा येथील रहिवासी असून, ती धनजीनाका येथील नॉव्हेल्टी दुकानात काम करत होती. रविवार, ८ जून रोजी सकाळी ९ वाजता ती कामावर गेली. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले.
वडील अलीसाहेब मुकादम यांनी दुकानमालक अनसार मेमन यांच्याशी संपर्क साधला असता, अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी विविध भागांत शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण अजबाचा थांगपत्ता लागला नाही.
शेवटी रात्री ११.३९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अजबाच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १३७ (२) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस युद्धपातळीवर तपास करत आहेत.
शहरात भरदिवसा अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सर्व शक्यता तपासत असून, अजबाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
(वाचकांना विनंती – अजबा बद्दल काही माहिती असल्यास रत्नागिरी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.)