जगातील २३ हजार स्पर्धकांचा समावेश
भारतातील ४२३ स्पर्धक
कस लावणारी थंडी, विषम वातावरण
भारतीय दूतावासानेही केले स्वागत
रत्नागिरी : जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये आणि मुळचे खेडमधील सध्या ठाणे स्थित सुरेश वेलणकर यांनी दिव्यांगत्वावर मात करत स्पर्धा पूर्ण करून पदक पटकावले. ही स्पर्धा रविवारी दक्षिण आफ्रिकेतील पिटर्समारीबर्ग ते डरबन या ९० किमी अंतराची होती. हे अंतर १२ तासात पार करायचे होते. प्रसाद देवस्थळी (११ तास ३८ मिनीटे, ४९ सेकंद) आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये (११ तास २४ मिनीटे ४१ सेकंद) यांनी स्पर्धा पूर्ण केली. सुरेश वेलणकर (९ तास ४१ मिनीटे ०८ सेकंद) यांनी स्पर्धा पूर्ण करून पदक मिळवले.
जगातील सर्वांत जुनी असलेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनचे यंदाचे ९८ वे वर्ष होते. चढ- उतार, डोंगर, अडथळे पार करत देवस्थळी व डॉ. गणपत्ये यांनीही स्पर्धा पूर्ण केली. चिपळूण सायकलिंग क्लबचे डॉ. गणपत्ये यांनी २ वेळा लोहपुरुष, सायकलिंगमध्ये एसआर, हाफ आर्यनमॅन, डिस्ट्रन्स ट्रायथलॉन पूर्ण केल्या आहेत.
धावनगरी रत्नागिरी अशी ओळख करून देणारे प्रसाद देवस्थळी हे मॅरेथॉन आयोजित करतात व देशभरातील विविध मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही भाग घेतात. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे फाउंडर मेंबर, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या देवस्थळी यांचे लाईव्ह लोकेशन काल सर्वजण पाहत होते. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर रत्नागिरीकरांनी जल्लोष केला.
डॉ. गणपत्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कॉम्रेड मॅरेथॉनविषयी खूप ऐकले होते. परंतु प्रत्यक्ष तिथली भव्यता बघून मन भरून आलं. विविध देशांचे, विविध वंशाचे हजारो अॅथलिट्स आमच्याबरोबर धावत होते. संपूर्ण मार्गावर छोट्या छोट्या गावातूनही दक्षिण आफ्रिकेचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आम्हाला चिअरअप करत होते. विशेषतः आम्हाला बघून इंडिया इंडिया, नमस्ते, जय हिंद असे बोलून प्रोत्साहन देत होते. शेवटच्या ३० किलोमीटरमध्ये टाकलेले प्रत्येक पाऊल हे सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते. प्रसाद आणि मी ही स्पर्धा पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू ठरलो, याबद्दल आनंद आहे.
या स्पर्धेविषयी प्रसाद देवस्थळी म्हणाले की, सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून स्पोर्ट्स टुरिझम हा विषय हाती घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली. फाउंडेशनतर्फे नुसत्या स्पर्धा आयोजित न करता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आयोजन कसे असावे हे कळण्यासाठी मी स्पर्धेत सहभागी झालो. वैयक्तिक कामगिरी हा विषय नव्हता. पण अर्थातच मोठी मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान आहे. एवढ्या स्वरूपातली अल्ट्रा मॅरेथॉन कोकणात लवकरात लवकर व्हावी, याकरिता धावताना काही किलोमीटरनंतर कशा पद्धतीने नियोजन असतं याचे व्हिडिओसुद्धा केले. वैयक्तिक कामगिरीपेक्षा कोकणवासियांना ही मोठी स्पर्धा कशी असते, हे समजावे यासाठी प्रयत्न केला. कोकणवासियांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली कोकण कोस्टल मॅरेथॉन असं वर्णन प्रत्येक कोकणवासीय स्पर्धेचं करतो. या यशामध्ये माध्यमांचाही वाटा आहे. कारण कोकण कोस्टल मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनला चांगली प्रसिद्धी दिली आहे.
कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धावताना सर्वच स्पर्धकांचा कस लागला. काल जाणकार असं म्हणत होते की, कालचे वातावरण नेहमीपेक्षा खूप वेगळे होते. परंतु या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता सराव म्हणून सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना प्रामुख्याने फायदा झाला, असे काही स्पर्धकांनी सांगितल्याचे श्री. देवस्थळी यांनी सांगितले.








