लोकशाही वाचवायची असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाडा- ॲड. असिम सरोदे

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हळूहळू विष पेरले, त्याची विषवल्ली इतकी पसरली की आज त्याचा दहा तोंडी नाग तयार झाला आहे. हा नाग लोकशाहीला डसणारा असून, त्याला लोकशाहीची कृष्ण लीला दाखवावी लागेल”, असे मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी केले.
निर्भय बनो सभा रत्नागिरीतील छ्त्रपती शिवाजी नगर शासकीय जलतरण तलावाजवळ झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी, ॲड. श्रेया आवळे, श्री. उत्पल उपस्थित होते.

ॲड. सरोदे म्हणाले, “आज पोलिसांच्या शक्तीचा गैरउपयोग केला जात आहे. आजच्या राजकारणा समोर मोठे आव्हान उभे आहे. जेव्हा सामान्य नागरिक जे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत ते अस्वस्थ होतात तेंव्हा लक्षात येते की लोकशाहीत आता बदल होणार आहे. आता सत्तांतर होणे गरजेचे आह, हेच सांगण्यासाठी बाहेर पडलो आहे. गुजरातमधून सुरू झालेले हे वादळ संपूर्ण भारतभर पसरले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून नागरिकांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि यांना निवडून दिले, मात्र आपण भस्मासुराला पळतोय हे आपल्या लक्षात आले नाही. आता हा भस्मासूर लोकशाहीच्या डोक्यावर बसलाय. लोकशाही वाचवायची असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाडा. कारण भाजप आणि विशेषतः यांच्या नेतृत्वाखालचा भाजप हा भ्रष्टाचारी आणि धर्मांध दोन्ही आहे, हे विदारक एकत्रीकरण आहे.”

ॲड. सरोदे म्हणाले, “आज अनेक पत्रकारांवर आर्थिक दबाव आहे. धर्म, जात याला भाजपकडून महत्त्व दिले जात आहे ते केवळ राजकारणासाठी. हिंसेचा आणि भाजपचा जवळचा संबंध आहे. हे मोदी सरकार की भारत सरकार हा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना, चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि चिन्ह अजित पवारांना दिले. पण आज भाजपने त्यांची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. २-५ च्या वर जागा न देता ह्या दिलेल्या जागाही कमळ चिन्हावर निवडायचा आहेत. त्यामुळे आता शिंदे आणि पवांरांबरोबर गेलेले आमदार स्वपक्षात येण्यासाठी धडपड करत आहेत. इथल्या मंत्री तर शिवसेन, राष्ट्रवादी असे डबल अनुभवी आहेत. त्यांनी जनतेसमोर येऊन प्रामाणिकपणे माफी मागावी. जनता नक्की माफ करेल. ”

या वेळी बोलताना श्री. उत्पल यांनी वैचारिक समस्या पद्धतशीरपणे निर्माण केली असल्याचे सांगितले. १ मे २०२३ ला निर्भय बनो या चळवळीला सुरुवात झाली. रत्नागिरीतील ही ५७ वी सभा. ही चळवळ वेगाने पसरत असून अनेकजण जोडले गेले आहेत आणि त्यात सातत्याने भर पडत आहे, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सत्ताधाऱ्यांना घालवून देण्याची भूमिका घ्यायला लावण्याची वेळ सत्ताधाऱ्यांनीच आणली आहे. अतिशय निर्लज्जपणे टोकाची हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न होत आहे, ती सहन करायची नाही, असे आवाहन श्री. उत्पल यांनी केले.

ॲड. आवळे यांनी वकिलांची निष्क्रिय भूमिका बघून वाईट वाटल असल्याचे सांगितले. सत्तेत आल्यानंतर यांनी अनेक कायद्यात बदल केले आहेत. केवळ कायद्यांचे नाव, क्रम बदलून ब्रिटिशांपासून आम्ही सोडवले अशी बोंब करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे गुन्हेगारीकरण झाले आहे. दंगलीत राज्य प्रथम आहे. या दंगली जातीय, धार्मिक आहेत. खून, बलात्कार, लैंगिक छळ यातही राज्य पुढे आहे. मात्र यावर काहीच बोलले जात नाही. स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य न देता त्यावर दुहेरी भूमिका घेतली जात आहे. सत्तेचा लोभ असणारे हे लोभी सत्तेसाठी खोटे बोलतात, खोटी आश्वासने देतात. तुम्ही आधी काय होतात याच्याशी देणंघेणं नाही आत्ता काय करता हे महत्त्वचे. निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा सत्यावर, लोकशाहीवर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. चौधरी म्हणाले, “साखरपा मार्गे येताना पाहिले तर आज अनेक ठिकाणी माळीण सारखी दुर्घटना घडू शकते असा विकृत विकास गडकरींनी केला आहे. कोकणचा पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. हा ऱ्हास करणारे कोण आहेत. रामदास कदमांनी पर्यावरण मंत्री असताना काय केले. तुमचे राजकीय वाद मतभेद हे तुमच्या पुरतेच ठेवा. त्याचा सुड राज्याच्या पर्यावरणावर उगवणार असाल तर ते आम्हाला मान्य नाह. आज जे काही राजकारण चालले आहे त्याकडे सतर्कतेने बघण्याची गरज आहे. अशलाघ्य व्यक्तिवाद राजकारणात घुसवला जात आहे. आता ४०० चा नारा देत आहेत मात्र यांना हद्दपार करायला हवं. लोकशाही एका माणसावर चालत नाही एका माणसावर चालते ती हुकूमशाही असते. त्यामुळे आम्हाला पक्ष, चिन्ह, उमेदवार महत्त्वाचे नसून नागरिकांची भूमिका महत्त्वची. महाराष्ट्राच्या राजकारणाचे उत्तर प्रदेशीकरण सुरू आहे. ”

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक अभिजीत हेगशेट्ये यांनी रत्नागिरीत या सभेची मागणी आग्रहपूर्वक केली केल्याचे सांगितले. ही सभा लोकांनी लोकांसाठी आयोजित केली असून आज सगळीकडेच कोंडल्यासारखी परिस्थिती आहे पीएमओ, सीएमओ आणि सीईओ एवढेच फक्त कार्यरत आहेत. निवडून आलेल्यांना काहीच अधिकार ठेवलेले नाही. सर्वत्र एक प्रकारची दहशत माजवली असून या भीतीच्या वातावरणाला वाचा फोडण्याचे काम ही मंडळी करत आहेत.

यावेळी ॲड. श्रेया आवळे यांच्यासह तबरेज सायेकर यांच्या पत्नीचा तसेच पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मुलाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार राजन साळवी, दीपक राऊत, बशीर मुर्तुजा कुमार शेटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा