एमटीएस ऑलिंपियाडमध्ये पूर्वा सचिन देसाईचा राज्यात दबदबा; रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक

रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी) : आर.एस.के. फाउंडेशन द्वारा आयोजित एमटीएस ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा 2024-25 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कु. पूर्वा सचिन देसाई हिने प्रथम क्रमांक मिळवत संपूर्ण जिल्ह्याचा आणि कांटे गावाचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे, राज्यभरातून घेतलेल्या या परीक्षेत तिने राज्य गुणवत्ता यादीत 19वा क्रमांक पटकावला आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
पूर्वा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कांटे येथे चौथी इयत्तेत शिक्षण घेत होती आणि तालुकास्तर, केंद्रस्तर याठिकाणी पहिला क्रमांक पटकावून तिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. सध्या ती इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून तिच्या यशामागे शाळेतील शिक्षक, पालक यांचे अनमोल योगदान आहे.
पूर्वाच्या यशात वर्गशिक्षक श्री. पंकज कुशिनाथ खडांगळे आणि मुख्याध्यापिका सौ. प्रार्थना सचिन देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले. त्यांच्या मेहनतीचे फलित म्हणून पूर्वाने हे यश संपादन केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आर.एस.के. फाउंडेशन हे गेली ३० वर्षे राज्यभर गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, तर्कशक्ती, आत्मविश्वास आणि
स्पर्धा परीक्षेची तयारी यावर भर देत उपक्रम राबवत आहे. ‘भविष्यासाठी योग्य दिशा दाखवणं’ हे या फाउंडेशनचे प्रमुख ध्येय असून, त्याअंतर्गत दरवर्षी एमटीएस ऑलिंपियाड परीक्षा आयोजित केली जाते.
पूर्वाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग, पालक, ग्रामस्थ तसेच केंद्रप्रमुख सौ. स्नेहा तुषार कीर मॅडम यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पूर्वाच्या यशाने कांटे गावाचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा