रत्नागिरी | २५ जुलै २०२५ – कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरीत नदीचा धोकादायक प्रवाह
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जांभूडी नदीने भरणे पुलाजवळ धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने तत्काळ सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले असून, नदीकाठच्या गावांमध्ये सुरक्षिततेची खबरदारी घेतली जात आहे. वाशिष्टी, काजळी, शास्त्री, सोनवी आणि बावरले या नद्यांची पाणी पातळी देखील वाढत आहे.
दापोली, गुहागर, मंडणगड आणि लांजा तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक सखल भाग जलमय झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असून, बचाव कार्य सुरू आहे.
सिंधुदुर्गात काही घरांचे स्थलांतर, शेतीचे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण, कुडाळ आणि वैभववाडी भागात पावसाचा जोर टिकून आहे. काही गावांतील धोकादायक स्थितीत असलेल्या घरांतील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन गस्त घालत असून, आपत्कालीन पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. काही भागांत भातशेतीसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
पालघर आणि रायगड जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर
पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, डहाणू आणि पालघर शहरात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. काही लोकल सेवा विस्कळीत झाल्याचे समजते. वीजपुरवठाही खंडित झाला असून, वीज वितरण कंपन्या दुरुस्तीच्या कामात व्यग्र आहेत.
रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यांत मुसळधार पावसामुळे सावित्री नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नजरेत ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.
धरण क्षेत्रांत पाणीसाठ्यात वाढ; विसर्गाची शक्यता
कोकणातील विविध धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, काही धरणांमधून नियोजित पातळी ओलांडल्यास पाणी विसर्ग होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याचा इशारा आणि नागरिकांना सूचना
हवामान विभागाने कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करत नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
प्रशासन सज्ज; मदतकार्य सुरू
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, नागरिकांना आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना:
ताज्या अपडेटसाठी हवामान विभागाचे संकेतस्थळ (www.imd.gov.in), स्थानिक प्रशासनाचे सोशल मीडिया हँडल्स किंवा जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
photo- NDTV








