रत्नागिरी/सिंधुदुर्ग/रायगड : कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी, शास्त्री, कुंडलिका, कोदवली, गड या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून काही ठिकाणी पाणी घरात शिरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नगरपालिकेकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून प्रशासन सतत संपर्कात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गड नदीने धोका पातळी पार केली आहे. कणकवली-मालवण मार्गावर पाणी साचल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. मालवण किनाऱ्यावर प्रचंड वारे आणि उंच लाटा उसळत असल्याने मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीने पूराचा इशारा दिला असून कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण किनारपट्टीवरील अनेक खेडी-गावे पाण्याने वेढली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोकणातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम आहे. आंबा घाट, परशुराम घाट, खेड परिसरात दरड कोसळल्याने काही वेळ रस्ते बंद झाले. पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना तातडीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून (INCOIS) उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत १८ ते २० ऑगस्ट दरम्यान ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम समुद्रकिनारी राहणाऱ्या गावांवर होत आहे.
राज्यात पावसाचा हाहाकार कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोर धरला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. तब्बल १९,२०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, कोयना नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून खडकवासला आणि पानशेत धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. घाटमाथ्यावरच्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून नद्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. “२१ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. प्रशासन सज्ज आहे; नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांनी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याने अनेक गावांना अलर्ट देण्यात आला असून, आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्य पावसाच्या विळख्यात असून, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. कोकणातला पाऊस धोक्याची घंटा ठरत असताना, राज्य प्रशासन सतत संपर्कात राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करत आहे.