राज्यात अतिवृष्टीचा कहर; रायगड, पुणे घाटात रेड अलर्ट, राज्यभर पूरस्थिती गंभीर 

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी): राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. कोकणापासून ते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत पावसाचा जोर कायम आहे. रायगड आणि पुणे घाट भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे, तर नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर यांसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, ठाणे या किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा दिला आहे. ३.४ ते ४.४ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असून त्यासोबत ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग किनाऱ्यावरही २.९ ते ४.० मीटर उंच लाटा येण्याचा इशारा दिला गेला आहे. किनारपट्टीवरील खेड्यांना समुद्राच्या धुपीपासून धोका असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नद्यांची वाढती पातळी
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, काजळी, कोदवली नद्यांनी तर रायगडमधील अंबा व सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीने बदलापूर, जांभूळपाडा परिसरात इशारा पातळी पार केली आहे. मुंबईतील मिठी नदीनेही धोका पातळी गाठल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले. सांगलीतील कृष्णा नदीतून पाणी पातळी वाढत असून गावोगावी पुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा व घटप्रभा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाकडे येणारा प्रवाह वाढला असून तो २ लाख क्युसेकवरून २.५ लाख क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जीवितहानी व शेतीचे नुकसान
गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दहा जण जखमी झाले असून बहुतेक अपघात हे दरड कोसळणे, घर कोसळणे किंवा पुराच्या पाण्यात वाहून जाण्यामुळे झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थितीत एकट्याच आठ जणांचा बळी गेला आहे. राज्यभरात दीड हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ६१०, पालघरमधील ५०० हून अधिक नागरिक, तर सांगली व रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो नागरिकांचा समावेश आहे.
शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. राज्यातील सुमारे १४ लाख एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. धान, सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईतील स्थिती गंभीर
मुंबई महानगरालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मिठी नदीने धोका पातळी ओलांडल्याने सुमारे चारशे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. वडाळा-चेंबूर दरम्यान मैत्रीपार्क येथील मोनोरेल बंद पडल्यामुळे ५८३ प्रवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विक्रोळी, भांडूप, सुर्यानगर, खिंडीपाडा भागात संभाव्य भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना एसआरए इमारतींमध्ये तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली.
बचाव आणि मदतकार्य
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके राज्यभरातील आपत्तीग्रस्त भागांत तैनात करण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे भारतीय सैन्य दलाचे ७२ जवानांचे पथक कार्यरत असून त्यांनी २९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पालघर जिल्ह्यात मोरी गावातील ७० नागरिकांना एनडीआरएफने वाचविले. सांगली शहरातील पूरग्रस्त भागातून ४७१ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक सुरक्षेसाठी तो मार्ग बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात दरड कोसळली होती; मात्र तत्काळ मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
सरकारचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर तातडीने नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जीवितहानी झालेल्या कुटुंबीयांना तत्काळ मदत, शेती व घरांच्या नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा झाली असून शेजारच्या राज्यांतील प्रकल्पांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय साधला जात आहे.
पुढील २४ तासांचा अंदाज
राज्यात पुढील २४ तासांसाठी रायगड, पुणे घाट, मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही अतिवृष्टी होत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
राज्यातील परिस्थिती अजूनही गंभीर असली तरी प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्यदलाची पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा