कोकणासह राज्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढणार; धरणे भरली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई | २८ जुलै

बंगालच्या उपसागराकडून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, नदी-नाल्यांना पूर येणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हवामान अंदाजानुसार २९ जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात जाणवेल. ३० जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, कोकण आणि घाट भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा

दरम्यान, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे. अनेक धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणात २६७.६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून, तानसा धरणातून ६६३१.५६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भातसा धरणात ८५१.४४३ दशलक्ष घनमीटर साठा असून तेथून २९६.४० क्युमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मोडकसागर धरणातूनही ६१३४ क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात २१०.९०८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यातील हेटवणे प्रकल्प ९१.५० टक्के भरला असून, जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी २३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पात ६६.३९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून ६१.६३ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. अर्जुना प्रकल्पात ७२.५६ दशलक्ष घनमीटर तर नातूवाडी प्रकल्पात १८.३७७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणात ४४७.३६९ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला असून, अरुणा, कोरले-सातंडी आणि देवघर या प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणी उपलब्ध झाले आहे.

रायगडमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस

महावेध संकेतस्थळावरील २८ जुलैच्या आकडेवारीनुसार, रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०७६.८० मिमी पाऊस झाला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २४ तासांत सर्वात कमी ७.८० मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत ७९.४३ टक्के पर्जन्यमान नोंदवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १३४१.२० मिमी पाऊस झाला असून, टक्केवारीच्या दृष्टीने हे प्रमाण ४५.६१ टक्के आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी नदी, नाले, धरण क्षेत्र, घाट रस्ते आणि सखल भागात विशेष खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

आणखी वाचा