रत्नागिरीत ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन २०२६’चे भव्य आयोजन

नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन ‘सरिताज किचन’ फेम सरिता यांची प्रमुख उपस्थिती वंदे मातरम्‌च्या १५० व्या वर्षानिमित्त मुलांसाठी विशेष चित्रकला स्पर्धा

रत्नागिरी, दि. ३० : रत्नागिरीकरांसाठी नववर्षाची सुरुवात उत्साहात होणार असून ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन ३, ४ आणि ५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. खरेदी, मनोरंजन आणि ज्ञानवृद्धी यांचा संगम साधणारे हे प्रदर्शन नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते होणार असून शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्थानिक नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, ३ जानेवारी रोजी सायंकाळी भव्य ‘ग्रँड फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महिलांसाठी मोफत HbA1c तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरोग्याबाबत जनजागृती करण्यावर आयोजकांचा भर आहे. ४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या ‘सरिताज किचन’ फेम सरिता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पाककला स्पर्धा तसेच लाईव्ह कुकिंग डेमॉन्स्ट्रेशन होणार असून, गृहिणींना नव्या रेसिपीज शिकण्याची संधी मिळणार आहे.

वंदे मातरम्‌च्या १५० व्या वर्षानिमित्त मुलांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये देशप्रेम आणि भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स, मोठ्या सवलतींसह खरेदीची संधी, खाद्य महोत्सव, लकी ड्रॉसह अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे कुटुंबासह आनंद लुटण्यासाठी आणि नववर्षाचा उत्साह साजरा करण्यासाठी ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन २०२६’ ही रत्नागिरीकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा