आम्ही व्हीआयपीचे पासपोर्ट आमच्या हातात घ्यायचो आणि त्यांना एक वेटिंग रूम मध्ये बसवून त्यांचा बोर्डिंग कार्ड त्यांचे इमिग्रेशन फॉर्म भरून त्यांच्या हातात द्यायचं. परंतु रतन टाटा साहेबांच्या बाबतीत हे असं कधीच घडायचं नाही. त्यांनी कधी त्यांचा पासपोर्ट आमच्याकडे दिला नाही किंवा कधी आम्हाला त्यांचा इमिग्रेशन फॉर्म भरून बोर्डिंग कार्ड काढून आणायला सांगितलं नाही. ते स्वतः काउंटरला उभे राहत असत. काउंटर वरच्या स्टाफला भयंकर दडपण यायचं कारण स्वतः टाटा साहेब समोर उभे आहेत हे बघून ते घाबरून गेलेले असायचे आणि त्यातच ते बोर्डिंग कार्ड लवकर निघायचं नाही परंतु रतन टाटा त्या स्टाफला खूप धीर देत म्हणायचे “डोन्ट वरी, टेक युअर टाईम” आणि ते थांबून स्वतःच बोर्डिंग कार्ड स्वतःच्या हातात घेत असत. इमिग्रेशन ऑफिसरला मी पळत पळत जाऊन सांगायचे की टाटा साहेब येत आहेत. पण टाटा साहेब नेहमीसारखे इमिग्रेशनच्या लाईन मध्ये उभे राहत. सीन असा होता. इमिग्रेशन ऑफिसर उभे राहून त्यांना पुढे बोलवत होते परंतु टाटा साहेब पुढे यायला तयार नव्हते आणि पॅसेंजरने मागे वळून पाहिले तेंव्हा त्यांना दिसले टाटा साहेब लाईन मध्ये उभे आहेत. पण लोकांचा रिस्पेक्ट बघा किती की कोणीही पुढे जायला तयार नव्हतं ते सगळे टाटा साहेबांना पुढे जायला विनंती करीत होते. नाइलाजाने टाटा साहेबांना पुढे जाऊन आपले इमिग्रेशन क्लिअर करावे लागत असे. असं नेहमीच घडत असे. असंच एक दिवशी माझी नाईट ड्युटी होती आणि रतन टाटा साहेब ट्रॅव्हल करत होते. नेहमीसारख्या सगळ्या फॉर्मालिटीज पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना बोर्डिंग साठी घेऊन जात होते. चालता चालता ते म्हणाले,” यु आर सो एनर्जेटिक, आय वॉन्ट टू गिव्ह यु वन नोट”. मी त्यांना बोर्ड केलं आणि विचार करत राहिले की मला ते ऍप्रिसिएशन लेटर देणार आहेत वाटतं. नाईट करून दोन दिवसाचा ऑफ होता म्हणून मी सातारला गेले परंतु नेमकं दोन दिवसांनी ते येणार होते.