रत्नागिरी विमानतळाचा ७५ टक्के टप्पा पूर्ण; तीन महिन्यांत पहिले टेकऑफ, वर्षभरात पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. ५ : रत्नागिरीच्या विकास आणि पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विमानतळ प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात शनिवारी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे विमानतळ प्रकल्पाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून पहिले विमान टेकऑफ करेल, अशी घोषणा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

हॉटेल सावंत पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सामंत यांनी विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून १० ते १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरी विमानतळ राज्यातील सर्वात सुंदर विमानतळ बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी **’ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’**सारख्या पंचतारांकित हॉटेल समूहांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू असून, वर्षभरात पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाला प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. वन विभागाच्या जागेवर ॲडव्हेंचर पार्क आणि ‘ट्री हाऊस रेस्टॉरंट’ उभारण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत. विमानतळ सुरू झाल्यानंतर रत्नागिरीचा हापूस आंबा, काजू आणि अन्य स्थानिक उत्पादने थेट परदेशात निर्यात करणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी विमानतळामुळे पर्यटन, उद्योग आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे सांगितले. तर आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी विमानतळ परिसरात स्वच्छता राखून पक्ष्यांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी मानले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा