रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीला ‘ड प्लस’ दर्जा

उद्योजकांना मिळणार बंपर सवलती; औद्योगिक विकासाला नवी चालना

रत्नागिरी, दि. २७ : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील एमआयडीसीचा दर्जा ‘क’ वर्गावरून थेट ‘ड प्लस’ वर्गात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील उद्योजकांसाठी विविध सवलती आणि शासकीय योजनांचे दरवाजे खुले होणार असून, नवीन उद्योगांच्या उभारणीसह विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

‘ड प्लस’ दर्जामुळे गडचिरोलीसारख्या विशेष औद्योगिक क्षेत्रांना मिळणाऱ्या विविध सवलती आणि सुविधांचा लाभ रत्नागिरीतील उद्योजकांना घेता येणार आहे. बँक कर्ज तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना उद्योगवाढीसाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे.

मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. लोटे परशुराम औद्योगिक परिसरासह जिल्ह्यातील विविध एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणि प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्याचा औद्योगिक विकास केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित न राहता लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांनाही त्याचा फायदा मिळणे आवश्यक आहे. ‘ड प्लस’ दर्जामुळे अशा उद्योगांना विविध शासकीय प्रोत्साहन योजनांचा लाभ घेता येणार असल्याने स्थानिक उद्योजकतेला बळ मिळण्याची शक्यता आहे.

उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा, कर्जसुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ सुलभ झाल्यास रत्नागिरी जिल्हा कोकणातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येऊ शकतो. ‘ड प्लस’ दर्जामुळे उद्योजकांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’ तयार झाल्याची भावना असून, या निर्णयामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा